Tuesday, 15 November 2016

एक अविस्मरणीय दिवाळी पहाट

आजकाल दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांच नुसत पेव फुटल आहे. पण हे ही खर की  रसिकांना खूप मोठमोठ्या, चांगल्या कलाकारांच्या मैफीलींची मनसोक्त मेजवानी अगदी पाटावर बसवून, हळद कुंकू लावून आणि वर दक्षिणा देऊन दिल्यासारखी मिळण्याचा असा अपूर्व योग असतो एवढ मात्र खरं. कारण एवढे सगळे चांगले चांगले मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम चकट फू ऐकायला मिळणं म्हणजे अगदी पर्वणीच ना.

या दिवाळीत रविवारी ३० आॅक्टोबर आणि सोमवारी ३१ आॅक्टोबर ला थंडीच्या उबदार झोपेचा मोठा त्याग करून पंडित फार्म गाठल. ३० ला राहुल देशपांडे आणि ३१ ला कौशिकी चक्रवर्ती. दोघही दिग्गज कलाकार. सगळ्यांचेच आणि विशेषत: युवा पिढीचे अतिशय आवडते कलाकार. कौशिकीच्या तर मी अगदी प्रेमात पडलेले आहे. आधीपासूनच. ती आली, तिनं पाहिलं आणि तिन जिंकलं अशा तिच्या व्यक्तिमत्वाने माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य रसिकांच्या मनाला अगदी भुरळ घातलेली आहे.
दिवाळी पाडव्याच्या  त्या सुरम्य पहाटे कौशिकीच गाण ऐकून मनाची अगदी  अशीच अवस्था झाली होती.

आनंदाच्या लहरी सगळ्या शरीरभर झिरपत आहेत. गात्रा गात्रातून, रोमारोमातून, नसानसातून आनंदाचे झरे खळखळ वहात सारे शरीर चैतन्याने, सुखाने भिजून गेलय. सकारात्मक उर्जेचा अखंड स्रोत गाण कानावर पडायला सुरूवात झाल्यापासून अंगावर बरसत आहे. गाण्यामधल, रागसंगीतातल खूप काही कळत नसल, सांगितल्या शिवाय राग ओळखता सुध्दा येत नसला तरीही कानांवर पडणारे सूर इतका आनंद देत आहेत की अगदी ब्रह्मानंदी टाळी लागावी. चेहरा असा हसरा, सुखी, आनंदी झाला आहे की जगातली कुठलीही दु:ख, काळजी जवळपास  फिरकूही शकणार नाहित.

मैफिल यशस्वी करण्यासाठीच्या सगळ्या आदर्श कल्पना, सगळे आदर्श संकेत, तिथे पाळले गेले होते. उत्तम, प्रशस्त, हवेशीर सभागृह, भव्य कलामंच, ध्वनिक्षेपकांची उत्तम व्यवस्था, मोठे मोठे स्क्रीनस्, उत्तम सहकलाकार, अगदी छाऽऽन सुराऽऽत लागलेली वाद्ये, सकाळची शांत वेळ, हवेतला सुखद गारठा सगळ अगदी जमून आणलेल होत. आणि या सगळ्या कोंदणात बसविलेला हिरा पण तितकाच तेजस्वी होता. परमेश्वराने अनंत हस्ते प्रदान केलेली  सुमधूर कंठाची ईश्वरी देणगी अतिशय कृतज्ञतापूर्वक आणि प्रयत्न पूर्वक जोपासलेसी आणि तावून सुलाखून ईश्वराच्या त्या देणगीला सोन्याची झळाळी आणलेली.
रूप सौंदर्य, लावण्याचीही देणगी देण्यात ईश्वराने कुठे कसूर केलेली नाहीच. पण निसर्गदत्त आवाजाप्रमाणे सुंदरतेलाही उच्च अभिरूचीचा जाणवणारा स्पर्श.  वस्त्राची, आभूषणांची निवड करतानाही  जोपासलेली कलात्मकता, हलकासा मेक अप केलेला सुंदर, हसतमुंख, प्रसन्न, सोज्वळ चेहरा. वागण्या बोलण्यात कुठेही सवंग पणा नाही. सगळ्याच बाबतीत उच्च अभिरूची जपलेल प्रसन्न व्यक्तिमत्व. गाण्याप्रमाणेच बोलण्याचा आवाजही इतका नादमधूर की जणू कंकणांची किणकिण. गुरूंबद्दलचा आदर, श्रोत्यांबद्दलची कृतज्ञता कलेच्या परंपरेबद्दल आदर दर्शविणार बोलणं आणि भावस्पर्शी डोळे. आजकाल स्क्रीन वरून आवाजातले, दिसण्यातले, देहबोलीतले सगळे बारकावे टिपले जातात. त्यात कुठेच कुठला उणेपणा नाही.
आणि गाण तर केवळ अप्रतिम. पतियाळा घराण्याच्या गायकीची सगळी वैशिष्ठ्ये अतिशय तयारीने दाखविणारं. तिच्या गायनामध्ये जबरदस्त सकारात्मक उर्जा आहे. स्वरांचे लगाव, ताना हरकतींची सहजता, तिन्ही सप्तकात अगदी लिलया, नजाकतीने संचार करणारा अत्यंत सुरेल सुमधूर असा आवाज सगळच कसं अगदी देखण आहे. आपल्या घरातल्या सर्व खोल्यांमध्ये आपण कसं सहजपणे स्वच्छंद बागडतो तसा तिचा आवाज तिन्ही सप्तकात लिलया फिरत असतो.
देवघरात लावलेल्या उदबत्तीच्या वलयांकडे एकटक पहात वसल की कशी समाधी लागल्यासारखी अवस्था होते तसा तिचा स्वरविस्तार उदबत्तीच्या, अलगद, हळुवारपणे वरवर जाणा-या वलयांसारखा सहज स्वराकाशाला भिडून, श्रुतींच्या सर्व बारकाव्यांना स्पर्श करत अलगद खाली येतो, वा-याच्या झुळुकीसरशी पुन्हा वर जातो, पुन्हा खर्जाला भिडून येतो  आणि आनंदाचा सुगंध सा-या मैफिलित पसरवित जातो.

तिथे असणा-या श्रोत्यांपैकी निम्मे तरी आमच्यासारखे नुसते कानसेन असतात. म्हणजे कुठला राग, कुठले स्वर, काही फारस माहित नसतानाही कान आणि मन तृप्त करून घेण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे कौशिकीच्या रागविस्ताराच्या कौशल्यावर काही लिहिण्या इतका माझा अभ्यास नसला तरी एक रसिक म्हणून एवढच म्हणता येईल की राग कुठलाही असला तरी त्याच्या सौंदर्याची अनुभूती, रसपरिपोष देणारा जातिवंत कलावंत समोर कलामंचावर असला की बरसणा-या स्वरधारांनी जो  भिजून चिंब होणार नाही तो करंटाच. आणि सुदैवान पुणेकर रसिक (माझ्यासह) या बाबतीत अगदी भाग्यवान आहेत हे तिथल्या उत्स्फुर्त प्रतिसादातून पुन:पुन्हा प्रतीत होत होतं.

सरिता कमळापूरकर.


Sunday, 6 November 2016

स्विट्झर्लंड

पृष्ठ क्रमांक ३

स्वित्झर्लंडमधल दुसर अाकर्षण होतं 'माउंट टिटलीस'. नेहमीचा सोपस्कार म्हणजे 'सकाळी सहाला वेक अप काॅल, सातला, 'एवढ्या सकाळी काय भूक लागणार' असं म्हणत म्हणत केलेला भरपेट नाष्टा अस उरकून आमच्या आरामबस मधून स्वित्झर्लंडच्या स्वर्गीय रमणीय परिसरामधून प्रवास करत आम्ही 'माउंट टिटलीस' च्या पायथ्याशी येऊन पोचलो. साधारण साडेनऊ वाजता टूर मॅनेजरने गंडोलाचे म्हणजे केबल राईडचे तिकीट काढले. पहिल्या गंडोलाने ११६२ मीटर उंचीवर पोहोचलो. गंडोला  वर वर जायला  लागल्याबरोबर तो पहा बर्फ! I saw ice!  सगळीकडून उत्स्फूर्त उद्गार आले.  सगळ्यांच्या नजरा गंडोलाच्या खिडक्यांकडे वळल्या. दूरवर बर्फाने आच्छादलेल एक शिखर सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होत. बाकी सर्वदूर नजरेला सुखावणा-या निरनिराळ्या छटांमधून हिरव्या  रंगाचे पट उलगडत होते.  गंडोला वर वर जायला लागला तस तस हिरवळीवर सांडलेले बर्फाचे पुंजके दिसायला लागले. सगळया डोंगर द-या हिरव्या रंगावर पांढरी नक्षी रेखाटलेल्या गालिच्यांनी सजल्या. नंतर दुसऱ्या गंडोलाने १७९६ मीटर इतकी उंची गाठली. अजून वर गेल्यावर गालीचा पांढरा झाला आणि नक्षी हिरवी. आणि नंतर, सर्वदूर पांढ-याशुभ्र हिमाचच आवरण पसरलेलं दिसायला लागल. आकाशाची पोकळी भेदून ऊंच उभारलेली भली थोरली पर्वतशिखरं, त्यावर आपल्या पूर्ण ताकदीने सर्वार्थाने वाढलेल्या आणि सर्वदूर पसरलेल्या वृक्षांच घनदाट जंगल,  पाताळ भेदणा-या खोल खोल द-या, त्यांच्या पूर्ण लांबीसकट दिसणा-या हिमनद्या आणि या पार्श्वभूमीवर ठिपक्यांसारखी दिसणारी तुरळक घर यांच, उंचावरून, नजरेच्या खालच्या पातळीवर होणार दर्शन.  रोमांचक, उत्तेजित करणार, उत्साहवर्धक, तरीही जरास ऊग्र, ह्रदयात धडकी भरविणार, जीवनाच्या क्षणभंगूरतेची, अस्तित्वाच्या क्षुद्रतेची जाणीव करून देणारं असं होतं. आम्ही वर होतो आणि नेहमी वर मान करून करूनही नजरेत न मावणारा हा अलौकिक निसर्गराजा,  शुभ्र धवल वस्त्र परिधान करून एका पायावर उभ्या राहिलेल्या एखाद्या तेजस्वी ऋषी मुनी सारखा आम्हाला इतक्या वरून पाहाता येत होता. या आल्प्स पर्वतांच्या तुलनेत नखाएवढ्या असलेल्या मानवाच्या बुध्दीची झेप या पृथ्वी वरचे द-याडोंगरच नव्हे तर अवकाश भेदून पलीकडे पोचलेली आहे आणि तिच्यामुळेच आज आपण या चित्तथरारक आणि अविस्मरणीय अनुभवाचे साक्षी होऊ शकलो या जाणीवेमुळे त्या बुध्दीला आणि बुध्दीदात्याला मनोमन प्रणाम करून आम्ही निसर्गाचा तो गूढ अनाकलनिय अविष्कार डोळ्यात मनात आणि कॅमेरा-यात बंदिस्त करून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.  नंतर जगातील पहिली रिव्हाॅल्व्हिंग केबल कार आम्हाला ३०२० मीटर उंचीवर घेऊन गेली. ती चहुबाजूने काचांनी बंदिस्त असलेली वर्तुळाकार रिव्हाॅल्व्हिंग केबल कार हा सुध्दा मानवनिर्मित चमत्कारच होता. एव्हाना सुरू झालेल्या हिमवर्षावा मुळे केबल कार पांढऱ्या धुक्यात पूर्ण गुरफटली गेली आणि लहरी निसर्गाने, आमच्यासाठी, गोल गोल फिरत जो नजारा आम्ही बघू शकलो असतो त्यांच द्वार जणू बंद करू घेतलं आणि मानवा वरचा स्वत:चा वरचढ पणा जणू पुन्हा निर्विवाद सिध्द केला. अर्थात जे पाहायला मिळाल होतं त्याची धुंदी इतकी और होती की आयुष्याच सार्थक झाल्यासारख वाटत होतं. इथंच या बर्फाच्या थंडगार कुशीत मरण आल तरी चालेल असही काय काय वाटत होतं.



तरीही माणसाची जिद्द पाहिली की अचंबित व्हायला होतं होतं. समुद्र सपाटी पासून  इतक्या ऊंचावर  हवा विरळ असते.  ऑक्सीजन कमी. त्यामुळे धावू नका, पळापळ करू नका, जास्त बोलू नका, जेवतानाही भरपेट जेवू नका अशा सूचना आम्हाला  मिळाल्या होत्या. या इतक्या आणि याहूनही कितीतरी कठीण अशा अडचणींवर मात करून एवढी मोठी मोठी स्ट्रक्चर्स माणसांनी कशी उभारली असतील याच नवल करत आम्ही परतलो. रात्री स्वप्नात सुध्दा बर्फात गुरफटलेल्या त्या खोल गुहा,  पांढऱ्या वृक्षांच घनदाट जंगल, आणि  मॅचिंग शुभ्र पांढरा पेहराव केलेले ते अती उंच हिमपर्वत यांच्यात मी कुठेतरी हरवले होते आणि भीती आणि आनंद यांच्या लहरींवर तरंगत होते.

स्विट्झर्लंड

पृष्ठ क्रमांक २.
दूरवर डोंगरांच्या पायथ्यापर्यन्त पसरलेली विस्तीर्ण हिरवीगार कुरणे,  डोंगरावरून मधूनच झुळझुळत खळखळत वहाणारे लहान मोठे झरे, क्वचित कुठे सरळसोट ऊंच कड्यावरून सुसाटत थेट खडकांवर धबा धबा कोसळणारे आणि उरात धडकी भरविणारे धबधबे, ऐल आणि पैल तीरावर हिरवाई घेऊन वाहणा-या हाईन, ल्युसन या नद्या, त्यांच पारसमण्या सारख मोरपंखी निळसर, स्वच्छ नितळ पारदर्शी पाणी,  भरभरून प्रसन्न असलेल्या या देखण्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाची शोभा शतगुणित करणारी परीकथेतल्या सारखी अतीव सुंदर, टुमदार, कौलारू घरे.  काही डोंगर उतारावर तर काही सपाटीला डोंगराच्या अगदी पायथ्याला, अगदी एकसारखी. भोवतालच्या निसर्गाशी अगदी एकरूप झालेली. कुठेही वैगुण्य नाही. विसंगती नाही. कुठेही कुरूपता नाही. सभोवतालच सारच देखणं, स्वच्छ, सुंदर.  घरांच्या आसपास, उमललेल्या टवटवीत अनेकरंगी फुलांची सजावट. भोवताली एकरा दोन एकरा मध्ये वा-यावर डोलणारी पिकं. हिरव्या कुरणांमधून मुक्तपणे चरणात-या शेळ्या मेंढ्या आणि जास्त करून गायी आणि त्यांच्या गळ्यातल्या घंटांच पार्श्वसंगीत. सगळंच कस पहाटेच्या सुंदर स्वप्नासारख.
आठ साडेआठ तासाचा प्रवास करूनही कुणालाही दमणूक झाल्यासारखे जरा सुध्दा वाटत नव्हते. आमची आलीशान गाडी,  अतिशय स्वच्छ सुंदर निरोगी हवा, दोन्ही बाजूला हिरवळीने आच्छादलेल्या अती उंच पर्वत रांगा आणि घनदाट जंगल यातून धावणारा झुळझुळीत रस्ता. त्यामुळे सर्वांचाच उत्साह ओसंडून वहात होता. 
सकाळी सहाला वेक अप काॅल, सातला, 'एवढ्या सकाळी काय भूक लागणार' असं म्हणत म्हणत केलेला भरपेट नाष्टा आणि आठला गाडीत बसायचं असा रोजचा ठरलेला दिनक्रम असायचा.  संपूर्ण युरोप ट्रीप मध्ये 'टाॅप आॅफ युरोप' आणि 'माऊंट टिटलीस' हे  संस्मरणीय अनुभव.  'High points of the entire tour'. असं म्हणणं अगदी संयुक्तिक ठरावं. कांन्टिनेंटल ब्रेकफास्ट आटोपून आम्ही त्यातल्या 'टाॅप आॅफ युरोप' च्या रोमहर्षक अनुभवासाठी जुंगफ्राॅऊ इथे जाण्यासाठी लॅटरब्रुनेन या सुंदर शहराकडे जायला निघालो.अवती भवती डोंगर उतारावर छोटी छोटी लाल कौलांची, उतरत्या छपरांची घरे,  सर्व दूर अनेकविध छटांमधून पसरलेली हिरवी जादू, उंचच उंच पाईन आणि फर वृक्षांची घनदाट गुंफण आणि डोंगरातून झेपावणा-या अनेक लहान मोठ्या धबधब्यांच पांढरशुभ्र फेसाळणार पाणी. मध्येच सर सर शिरवा शिंपणारा हिमवर्षाव,  आकाशातून कापूस पिंजल्यासारखे धरणीवर उतरणारे पांढरेशुभ्र ढग असं निसर्गाच अवर्णनीय रूप किती पहाव आणि किती नाही असं होऊन जात होतं. जुंगफ्राॅऊ येथे जगतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. हा सर्व प्रवास करण्यासाठी, भोवतालच निसर्ग सौंदर्य शतगुणित करणा-या अतिशय देखण्या मिटरगेज मिनी ट्रेन्स आहेत.  प्रवास एकूण दीड तासाचा. पण मध्ये एका ठिकाणी गाडी बदलावी लागते. लॅटरब्रुनेन ते लीन शेडगे या स्टेशनपर्यंत एका ट्रेनने आणि शेडगे ते जुंगफ्राॅऊ दुस-या ट्रेनने अशा दोन टप्प्यातून हा प्रवास करावा लागतो. तशी तर ही ट्रेन जवळ जवळ संपूर्णतEiger आणि Mönch या पर्वत रांगांमधून बांधलेल्या 'जुंगफ्राॅऊ' टनेल मधून जाते. परन्तु काही ठिकाणी ओपन स्पेसेस ठेवलेल्या आहेत जिथून तुम्ही रेल्वे ट्रॅक शेजारून  जात असलेल्या बर्फाने आच्छादलेल्या पर्वत रांगा पाहू शकता आणि त्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता.   या गाडीतून प्रवास करताना पहिल्या टप्प्यात सभोवताली आल्प्स पर्वतरांगावरची हिरवीगार कुरण, त्यांवर चरणा-या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यात वाजणा-या त्या टिपीकल काऊबेल्स आणि जवळून जाणा-या दुस-या मिनी ट्रेन्स असा सुंदर नजारा पाहायला मिळतो. सोव्हिनीयर्स म्हणून या  काऊबेल्स सीटीमधल्या अनेक दुकानांमध्ये विकायला  ठेवलेल्या आढळतात. या सिनिक रेल्वे ट्रॅकचे काम १६ वर्ष चालू होते आणि १/८/१९१२ रोजी युरोपातील ३४५४ मीटर उंचीवरील, जगातील सर्वात जास्त उंचीवरील हा रेल्वे मार्ग सर्वसामान्य लोकांकरिता खुला झाला. आल्प्स पर्वतातील जुंगफ्राॅऊ हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४१५८ मीटर (१३६४२ फूट) एवढी आहे. आम्ही जाणार होतो त्या जुंगफ्राॅऊ - टाॅप आॅफ युरोप या जागेची उंची ३४५४ मीटर (११३३३ फूट) एवढी आहे. ट्रेनने जसं जसं वर जायला लागलो तस तस पांढऱ्या शुभ्र बर्फात अवगुंठित झालेल्या आणि हिरव्या अलंकारांनी नटलेल्या सृष्टीच्या स्वर्गीय सौंदर्याच गारूड मनावर चढायला लागल होतं. जुंगफ्राॅऊ इथल्या हाॅटेल मध्ये आम्हाला इंडीयन लंच वुईथ शॅम्पेन असं अॅरेंज केलं होतं.  जेवण सुंदरच होतं पण टूर मॅनेजरने आधीच सांगितल्या प्रमाणे इतक्या उंचीवर आल्यामुळे बऱ्याच जणांना विरळ हवेचा त्रास जाणवायला लागला होता. काही जणांना श्वास घ्यायला त्रास होत होता तर काही जणांना चक्करही आल्यासारखे वाटत होते. काही लोकांसाठी तिथल्या स्थानिक डाॅक्टरांनाही पाचारण कराव लागल.  त्यामुळे काही जणांसाठी त्या ठिकाणाहून  पुन्हा परत खालच्या पाॅईंट पर्यंत जाण्याची सोयही करण्यात आली. अर्थातच टूर मॅनेजरने ह्या सगळ्याची कल्पना आधी दिलेली होतीच. या पाॅईंट पासून पुढे अजून उंचावर इथली मुख्य आकर्षणं होती. मोठ्या अक्षरात लिहिलेल्या '<TOUR' या अक्षरांची खूण पकडून चालत राहिल की स्फिंक्स, अॅलेक्स ग्लेशियर, मॅजिक हट, अल्पाईन सेन्सेशन, आईस पॅलेस असं सर्व बघत बघत आपण आपोआप मूळ ठिकाणी येऊन पोचतो.  स्फिंक्स याच्या टेरेसची उंची ३५७१ मीटर आहे. ४ जुलै १९३१ रोजी इथे एका संशोधन केंद्रांचे उदघाटन झाले. स्फिंक्स पर्यंत जाण्यासाठीची लिफ्ट २७ सेकंदात इथे येऊन पोहोचते.  येतील उघड्या गॅलरीतून Glacier चा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. १९३४ मध्ये दोन डोंगरी वाटाड्यांनी येथील बर्फामधून गुहा खोदण्याचे काम सुरू केले. या गुहेत अनेक वाटा आहेत. आणि  स्फटिका प्रमाणे चमकणारी, गरूड, पेंग्विन अशी बर्फातील अनेक शिल्प तिथे जागोजागी उभी केलेली आहेत. असा हा इथला आईस पॅलेस एक मानवनिर्मित चमत्कारच म्हणावा लागेल. 








स्विट्झर्लंड

पृष्ठ क्रमांक १

स्विट्झरलॅंड - टॉप ऑफ यूरोप  अाणि माउंट टिटलीस.

थॉमस कुक तर्फे निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी ३ जुलैच्या ऐवजी ६ जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जामानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्स ची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबई मधल्या इमराईट्स च्याच आलीशान हाॅटेल मध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोचलाे आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो. 

पंधरा दिवसांमध्ये दहा देश आम्ही पादाक्रांत करणार होतो. त्यामुळे प्रत्येक देशाला फक्त टपली मारूनच पुढे जाव लागेल असं वाटत होतं.  थाॅमस कुक ने आमच्या साठी ठरविलेली मर्सिडीज गाडी मात्र फारच मस्त होती. आलीशान,  स्चच्छ, आरामदायी,  एअरकंडीशन्ड अशी ती बस लंडन मधल्या स्वच्छ सुंदर, गुळगुळीत रस्त्यांवरून जशी वहात चालली होती. मोठमोठ्या स्वच्छ काचांमधून लंडन शहर आणखीनच सुंदर दिसत होतं. एक्स्पर्ट इंग्लिश  स्पीकिंग गाईड आम्हाला बस मधे बसल्या बसल्याच  'Highlights of London's landmarks' दाखवत होता. एक तर लंडनला एक दिवस उशीरा पोहोचल्या मुळे विमानातून लॅंड होऊन आम्ही डायरेक्ट या बस मध्येच बसलो होतो. त्यामुळे बस मध्ये आम्ही शाळेतल्या वांड मुलांसारखे बॅक बेंचर्स होतो. गाईडचे अॅक्सेंट नाही म्हटल तरी डोक्यावरून जात होते. बर्किंगहॅम पॅलेस, हाईड पार्क,  दि बिग बेन, वेस्टमिन्स्टर अॅबे, हाऊस आॅफ पार्लमेंट, ट्रॅफल्गर स्क्वेअर, पिकॅडली सर्कस, टाॅवर ब्रीज, थेम्स रिव्हर अस बरच काही काही गाईड दाखवत होता आणि त्या अनुषंगाने माहिती पण सांगत होता.  नीट ऐकू येत नव्हत. कळत नव्हत. मला जरा नर्व्हस वाटायला लागल होतं. सगळं डोक्यावरून चाललंय असच वाटत होतं. असच रोज चालणार की काय. मग ट्रीपला काही अर्थच राहाणार नाही असही वाटायला लागल होतं. पण नंतर, मस्त इंडियन लंचचा आस्वाद घेऊन झाल्यावर मात्र आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला, मॅडम तुसाज् वॅक्स म्युझियम, सुप्रसिध्द लाॅर्डस् क्रिकेट ग्राऊंड, आणि लंडन आय यांच गाडीतून उतरून सविस्तर आणि एक्स्पर्ट गाईडच्या एक्सपर्ट काॅमेंटस् सह दर्शन घडविल आणि त्या दर्शनाने मात्र आमचे डोळे निवले आणि आत्मा थंड झाला. मग मात्र ट्रीपची खरी मजा यायला सुरवात झाली. खूप छान वाटायला लागल. 

लंडन नंतर पॅरीस.  आयफेल टाॅवरच्या सर्वात टाॅप (थर्ड) लेव्हलवरून पॅरीसच रमणीय दर्शन, सीन नदी मधून क्रुझ ने केलेला प्रवास, ब्रुसेल्स, अॅमस्टरडॅम,  हाॅलंड आॅफ मिनीएचर, वगैरे करत करत,  घनदाट वनराईमुळे  वर्षानुवर्ष जिथे सूर्यप्रकाश जमीनीवर पोहोचू शकत नाही अशा सदाहरित ब्लॅक फाॅरेस्ट मधून प्रवास करत, डोंगर उतारावरच्या चित्रातल्या सारख्या देखण्या घरांची गाव बघत बघत, जगप्रसिद्ध कुकु क्लाॅक ची शोरूम पाहून आणि त्याची खरेदी करून, आणि जगप्रसिद्ध ~हाईन फाॅल्स च्या अगदी जवळ नेणाऱ्या छोट्या होडीतली धाडसी सफर करून, ट्रीपच्या आठव्या दिवशी आम्ही आमच्या एसी कोचने स्विट्झरलॅंड कडे प्रस्थान ठेवले. 

 जगप्रसिद्ध ~हाईन फाॅल्स

१३ जुलै च्या रात्री जवळ जवळ आठ साडेआठ तासाचा प्रवास करून, अर्थात मध्ये मध्ये साईट सीईंग करत आम्ही स्विट्झरलॅंड मधील झुरिच इथल्या Hilton हाॅटेल वर पोहोचलो. स्विट्झरलॅंड हा मध्य युरोपातील उंच उंच आल्प्स पर्वत रांगांचा प्रदेश, संख्येने विपुल असलेल्या निळ्या हिरव्या आरस्पानी विशाल तळ्यांचा प्रदेश, परीकथेतल्या सारख्या देखण्या कौलारू घरांच्या गावांचा प्रदेश. इथल्या जुन्या शहरांनी, राजधानी बर्न इथल्या झिट्ग्लाॅग क्लाॅक टाॅवर, कॅथेड्रील सारख्या मध्ययुगीन काळातल्या त्यांच्या  मोठमोठ्या प्रेक्षणीय स्थळांच सौंदर्यही फार चांगल्या प्रकारे जपलं आहे. इथल्या स्की रिसाॅर्टस् आणि हायकिंग ट्रेलस् साठी सगळ्या जगातून पर्यटक इथे गोळा होतात. बॅंकिंग आणि फायनान्स इथल्या 'की इंडस्ट्रीज' आहेत आणि इथली चाॅकलेट्स आणि घड्याळ तर जगप्रसिद्ध आहेत.  कल्पना शक्ती थिटी पडते इतका अफाट, भव्य आणि देखणा निसर्ग आहे इथे.  अतिभव्य आणि डोळ्यांच पारण फिटाव असा लॅन्डस्केप.  गगनाला भिडणा-या आल्प्स पर्वतांच्या ऊंच ऊंच रांगा, त्यांची शुभ्र धवल हिमाने आच्छादलेली शिखरं, नितांत सुंदर हिरव्या रंगात लपेटलेला अवघा परिसर, हिरव्या रंगाच्या अनेकविध छटांची मुक्त उधळण. सरळ सोट बुंधा आणि शेंड्याला एकमेकांत गुंतत विस्तारलेल्या फांद्या असे पाईन वृक्ष आणि आकाशा कडे निमुळते होत गेलेली सुरूची झाडे आणि तत्सम वृक्षांचं घनदाट जंगल,  त्यांच्या सरळसोट शिस्तशीर बुंध्यांच मोहवणार जाळं सर्व दूर पसरलेल. 





Wednesday, 26 October 2016

प्रिन्सेस

प्रिन्सेस
तिने तिचे मोठे मोठे खट्याळ डोळे आणखीनच मोठे केले. तिचं छोटस अपर नाक शक्य होत तेवढ फेंदारल. आधीच गोबरे असलेले गाल फुगवले.  छोट्या छोट्या हातांचे पंजे असे कानामागे विस्फारून आणि चेह-या वर शक्य तेवढे रौद्र भाव आणण्याचा प्रयत्न करत माझ्या अगदी कानाशी तोंड आणून ती ओरडली,    'आय   अॅम  अ  स्के   री माॅन्स्टssssssर'.  आता मला घाबरण भागच होत. म्हणजे मी घाबरण्याचा अभिनय करण अपेक्षित होत त्यामुळे मी थरथर कापण्याचा अभिनय केला. मग लगेच ती  'अब्राका डब्रा' अशी काहीतरी जादू करून प्रिन्सेस झाली. मग आमची भीती गायब. हा सगळा खेळ चालू असताना तिच्या तोंडाची टकळी अखंड चालूच होती आणि त्याच बरोबर ही प्रिन्सेस इकडून तिकडे सारखी उड्या मारीत होती. दिवाणावरून खुर्चीवर, खुर्चीवरून टेबलावर, टेबलावरून बीन बॅगेत अश्या धडाधड माकड उड्या चालल्याच होत्या. त्यामुळे कुठेतरी धडपडून तिला लागेल या काळजीत मी होते.  'लागेल बाळा तुला' न राहवून मी तिला म्हटल तर ' आजी मी नाहीये बाळा', आय अॅम अ प्रिन्सेस' अस ठसक्यात म्हणून   'आजी वाॅच मी' म्हणत तिने टेबलावरून धाडकन जमिनीवर उडी मारली.  उडी मारताना टेबलाचा कोपरा लागलाच. मी एकदम मोठ्याने ओरडले. 'अग, बघ मी सांगतीय ना कधीपासून'. कशाला सारख्या उड्या मारतीयेस'.  झाssल. प्रिन्सेसने एकदम सातमजली भोकाड पसरल. आल्यामंतर, जादूमंतर वगैरे करून कसबस चुचकारल तर नाक फेंदारून मलाच म्हणते 'आय अॅम नाॅट युअर बेस्ट फ्रेंड'.
अशी ही प्रिन्सेस.  नाव परी आहे तिच. वय वर्ष अडीच. पण ती 'बीऽऽग गर्ल' आहे बरका. कुठल्याही अँगलने ती लहान आहे हे तिला अगदीच मान्य नाहीये. कधी चुकून जरी तिला कोणी म्हटल की तु छोटी आहेस अजून की लगेच अगदी तत्परतेने  ठसक्यात प्रतिक्रीया येते,  'मी नाहीये छोटी'. आय अॅम अ बीग गर्ल.
सावळ्या वर्णाची, अप-या नाकाची, गोब-या गालाची, लांब पापण्या असलेल्या तजेलदार डोळ्यांची, काळयाभोर दाट केसांची, तरतरीत आणि आजकालच्या समस्त बच्चेकंपनी प्रमाणेच जरा अतीच ओव्हरस्मार्ट. सिडनी मध्येच डे केअरला जात असल्यामुळे इंग्रजी आणि मराठी बोलण्यातही जबरदस्त अॅक्सेंट. पण तिच्या आवाजात मात्र ते सगळ बोलण फार फार गोड वाटत.
    'चला ब्रश करायला' अशा हाकेबरोबर 'ओकेsssss' असा समंजस स्वर काढून बाईसाहेबांची सकाळ उजाडली. कधी कधी एकदम 'गुड गर्ल' असते बर का. पण हा गुड गर्ल चा फार्म्युला नेहमीच वर्क होतो असं काही नाही. काही ठराविक मर्यादेपर्यंत ती गुड गर्ल राहून आपल्या कल्पने प्रमाणे चांगल वागू शकते. पण फारच मनाविरुद्ध झाल तर ' आय अॅम नाॅट अ गुड गर्ल' म्हणून ती सरळ सुटका करून घेते.
     नाकात बोट घालून हत्ती घोडे उंट यांची चाचपणी चालू होती. 'No nose pricking '. बाबा जरा रागावून म्हणाला. तर मॅडमचा लगेच फुगा झाला. सकाळी सकाळी तंद्री भंग झाली ना. ती एकदम ओरडली,
' बाबा, मी तुझ्याशी बोलत नाहीये'. 'पण नाकात बोट घालण चांगल असत का?'  मीहि जरा बाबाची री ओढली. बाजू अंगावर आल्यावर बाईसाहेब एकदम बिथरल्या. देन आय विल स्पीट आॅन यू'. फूरssss. मग देईन एक फटका. बाबा. फूरsssss. मग बाबाचा पण आवाज चढला. बाबाने धमकीच जरा हलकेच प्रात्यक्षिक केल. मग फारच अपमान झाला. डोळयात अगदी पाणी वगैरे आणून, सोफ्यावरची कूशन छातीशी आवळून, अगदी करूण आवाजात, केवढा आपल्यावर अन्याय झालाय अशा थाटात रीतसर भोकाड पसरून झाल. मग मला डेकेअरला नाही जायच. मी दूध नाही  पिणार अशी असहकार चळवळ सुरू झाली. तोंडाचा चंबू करून, भुवया आकुंचन करत, बळच नाक तोंड पालथ्या मुठीने पुसत फुरगटून ती सोफ्यावर जाऊन बसली.  कोणीतरी आपल्याला भाव देईल म्हणून मारक्या  म्हशीसारखी आळीपाळीने तिरक्या नजरेने सगळ्यांकडे कटाक्ष टाकण चालू होत. शेवटी कशीबशी आईने समजूत काढली आणि तडजोड झाली. दुस-या क्षणाला रडण बंद आणि तोंडाची टकळी सुरू.  'आई मी तुला हेल्प करू?' म्हणून मॅडम आईच्या कामात लुडबूड करून तिला हेल्प करायला किचन ओट्यापाशी स्टूल नेऊन त्याच्यावर चढून नवीन उपदव्याप करायला सज्ज झाल्या.
'आई तुला माहितीय, बेबी ग्रेस सगळ्याना स्प्लीट करते. आणि ती नाकात बोट घालते. बेबी ग्रेस ही  तिची प्रीटेंड लिटल सिस्टर असते. कधी बीग सिस्टर असते. कधी फ्रेण्ड असते तर कधी तिची बेबी असते म्हणजे ही तिची ममी असते. पण जे जे काही करायच नसत ते सगळ बेबी ग्रेस करते. मग ती सिली गर्ल असते आणि ही मात्र गुड गर्ल. तिच एक स्माॅल हाऊस आहे. डेकेअरच्या वाटेवर आज एका दिशेला तर उद्या तिस-याच कुठल्या दिशेला ती रोज मला ते न चुकता दाखवते.  बेबी ग्रेस तिथे रहाते अस बाईसाहेबांच म्हणण असत. कधी जर मी म्हटल की ते स्माॅल हाऊस प्रिॅटेन्ड आहे का, की मोठे मोठे डोळे करून ती म्हणते 'नाही आजी, ते रिअल स्माॅल हाऊस आहे माझ. बेबी ग्रेस तिथे काॅटमध्ये झोपलीये. मग मी तिला म्हटल की चल आपण दोघी जाऊया तुझ्या स्माॅल हाऊस मध्ये,  की मग लगेच खट्याळ डोळे करून माझ्या कडे बघत ती म्हणते  "that's not real grandma. तुला काहीच कळत नाही". घरात असलेली आजी डेकेअरमध्ये आपोआप  grandma  झालेली असते.
'मी आजी आजोबा बरोबर पॅडीज् मध्ये जाणार.  पॅडीज् नावाच एक मार्केट सिडनी ला सेन्ट्रल ट्रेन स्टेशनजवळ आहे.   तिथे शाॅपिंगला मुलांबरोबर आम्ही आधी जाऊन आलो होतो.  आज प्रथमच स्वतंत्र पणे सिडनी सीटी मध्ये फिरून यायच आणि येताना पॅडीज् मध्ये जाऊन यायच असा पराक्रम करण्याचा आमचा विचार होता तर  ही आमची प्रिन्सेस आमच्या बरोबर येण्याचा अगदी हट्टच धरून बसली होती. या उपद्व्यापी बाळाला बरोबर घेऊन फिरण आणि शाॅपींग वगैरे करण आजी आजोबांना कितपत शक्य आहे यावर घरात परिसंवाद चालला होता. प्रॅममध्ये तिला ठेऊन ट्रेन मध्ये प्रॅम चढवता येईल का इथपासून सुरुवात होती.
पण आजी आजोबाला तीच बरोबर घेऊन जाणार आहे असा तिचा सकाळी उठल्या पासूनचा अविर्भाव असल्यामुळे इतर सारे प्रश्न तिच्या लेखी गौण होते.
शेवटी खूप सारा जामानिमा करून, प्रॅम मध्ये तिला अडकवून निघालो. ट्रेन स्टेशन चालत जायच्या अंतरावर होत. प्रिन्सेसचा ड्रेस तिला फार आवडतो. त्यामुळे तसा ड्रेस, मॅचींग हेअरबॅण्ड, मॅचींग शूज असा मॅडमचा मोठा थाट होता आणि स्वारी खुशीत होती. त्यामुळे 'आजी तुला माहितीय' हा ड्रेस मी माझ्या स्कूल मध्ये (ती डे केअरला स्कूल म्हणते.  स्माॅल बेबीज् गो टू डे केअर. अस तिच म्हणण असत) घालून गेले होते ना तेव्हा हॅरी ने माझा ड्रेस असा ओढला. I don't like boys."
वगैरे अशा मोठ्या मोठ्या गप्पा चालल्या होत्या.
रमत गमत मस्त गप्पा मारत आम्ही ट्रेन स्टेशनवर पोचलो. सिडनीतली ट्रेन हा अगदी अनुभवण्या सारखाच प्रकार आहे. भिकारी, विक्रते,  फेरीवाले, आरडा ओरड, असा कुठलाही गोधळ नसलेले चकाचक स्वच्छ सुंदर प्लॅटफाॅर्मस्, ,  अगदी तुरळक गर्दी,   सुस्पष्ट सूचना दाखविणारे स्क्रीनस्, स्वच्छ वातानूकुलीत ट्रेन्स
मोठया मोठ्या स्क्रीनच्या स्वच्छ चकचकीत खिडक्या
ट्रेन कुठुन कुठे चालली आहे, कोणकोणते स्टाॅप्स घेणार आहे, येणारा स्टाॅप
कोणता, ट्रेनचे स्वयंचलित दार कोणत्या दिशेला उघडणार आहे   अशी सर्व माहिती सुस्पष्ट शब्दात देणा-या नम्र सूचना आणि doors closing please stand clear अशी प्रेमळ इशारा देणारी announcement. सिडनी ट्रेनच्या मी तर अगदी प्रेमात पडले आहे. प्रॅम साठी असलेल्या ठराविक डब्यात आम्ही आरामात चढलो. सीटवर बसल्याबरोबर तिची प्रॅम मधून उतरण्याची घाई सूरू झाली. उतरल्यावर मग कुणाला हाय करण, याच्या त्याच्याशी बोलण असे सोशल उपक्रम झाले.  सेंट्रल स्टेशनवर उतरलो.  मॅडमना प्रॅम मध्ये पुन्हा बसायच नव्हत. मग थोडी रूसवाफुगवी अस सार होऊन फायनली पॅडीज् मार्केट ला पोचलो. एवढा सगळा भाजी बाजार पाहून तिच्या उत्साहाला उधाण आल नाही तरच नवल. अर्थातच तिला प्रॅम मधून उतरवण आता भागच होत. मलाही भाजी मंडई टाईप तो बाजार पाहून एकदम पुण्यात आल्यासारख वाटल. तरीही डाॅलरच रूपयात धर्मांतर करताना पाकीट पटापट रिकामं व्हायला लागल तस आम्ही खरेदी आटोपली आणि निघालो. एव्हाना खरेदीही तशी बरीच  झाली होती. खूप सा-या पिशव्या प्रॅमच्या खालच्या कप्प्यात कोंबून, काही मागच्या हूकाला अडकवून आणि परीला मध्ये बसवून निघालो. पुन्हा सेंट्रल स्टेशनवर आलो. सिडनी सेंट्रल ट्रेन स्टेशन खूप मोठ आहे. तीन चार लेव्हल आहेत आणि अगदी पहिल्यांनेच
येणा-या आमच्या सारख्यांना जरा गुंतागुंतीच वाटाव अशीच त्याची रचना आहे.  आम्ही अगदी प्रथमच स्वतंत्र पणे आलो होतो. आणि आम्ही चुकलोच. चांगलच गोंधळलो. कुठे आहोत तेही नीट कळ॓ना. परी प्रॅम मध्ये माझ्या ताब्यात होती आणि आजोबाची शोधाशोध चालू होती. एका ठिकाणी खूप वर जाणारा एक जीना होता. मी जरा वरपर्यन्त जाऊन बघून येतो म्हणून भराभर जीने चढून तो वर गेला. 15 मिनिटे गेली" अर्धा तास गेला. पण आजोबाच परत येण्याच काही चिन्हच दिसेना. परीची बडबड चालूच होती. आता मात्र मी पण जरा घाबरलेच.  प्रसंगाच गांभीर्य माझ्या लक्षात यायला लागल. परी प्रॅम मध्ये होती त्यामुळे मला वर चढून जाता येत नव्हत. पैसे, मोबाइल सगळ आजोबा कडे होत आणि  माझ्याकडे  भाजी आणि प्रॅम मध्ये बसलेली परी या व्यतिरिक्त काहीच नव्हत. बर तिथून कुठे जाऊन काही प्रयत्न करावा तर आम्ही कुठे आहोत हे आजोबाला कस कळणार.  मी चांगलीच पेचात सापडले होते.   त्याच्या कडे सिडनीतला वेगळा फोन नंबर असल्याने तो मला पाठ नव्हता.
आधुनिक टापटीप  ड्रेस अप केलेली यंग जनरेशन, सफरचंदी गालांची, आणि निळ्या डोळ्यांची गुटगुटित बालक आणि टकाटक यंग ओल्ड स्त्री पुरूष अशी सिडनी ची प्रजा आजूबाजूला वावरत होती. एव्हाना एक तास होत आला होता. कुणाला मदतीला बोलवावे, काय करावे काहीच मला कळत नव्हत. परी प्रॅम मध्ये बसून जाम कंटाळून गेली होती. तिला खाली सोडण तर मला परवडणारच नव्हत. शेवटी कस कोण जाणे पण आमच्या कडे बराच वेळ पाहणारी एक ऑस्ट्रेलियन मध्यमवयीन स्त्री आमच्या जवळ आली आणि  whats your problem म्हणून विचारू लागली. मी माझ्या अगम्य इंग्रजी मध्ये माझी समस्या सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. माझ्या मुलीच्या घराचा पत्ताही मला पाठ नव्हताच. 'do you know phone no of your daughter?' तिने मला विचारले. मला अर्थातच तो पाठ नव्हताच. पण अचानक चमत्कार झाला. डेकेअर मध्ये सतत इंग्लीशच कानावर पडत असल्यामुळे  त्या बाईंच्या अॅक्सेंट मधला प्रश्न परीला बरोबर समजला आणि तिने लगेच सुरूवात केली 'झिलो फोर थ्ली टू"  हे पाठांतर घरी नेहमी चालायच. माॅलमध्ये शाॅपींगला गेल की हात सोडून मोठ्या माणसा सारख तो-यात हातातली छोटी ट्राॅली ढकलत एकट पुढे चालायची बाईसाहेबांना फार हौस. कुठे हरवली तर नंबर तरी पाठ असावा म्हणून तिची आई तिला रोज तो नंबर शिकवायची. तो टतङ
विचारला की लगेच सांगायची तिची सवय अशी उपयोगी पडली.  त्या बाईंनी प्रसंगावधान राखून तो नंबर तिच्या मोबाइल वरून डायल केला तर तो नंबर बरोबर माझ्या मुलीला लागला. मी जवळ जवळ रडकुंडीला आले होते. मुलीला सगळ सांगितल. त्या बाईंनी आम्ही नक्की कुठे उभे आहोत तेही तिला नीट सांगितल. मग सगळ काही  व्यवस्थित जमून आल आणि आम्ही सर्व परीसह व्यवस्थित घरी पोचलो. त्या अनोळखी बाईंचे मी मनापासून आभार मानले. पण आमच्या या पराक्रमाची खरी शिल्पकार होती ती मात्र आमची प्रिन्सेस!