पृष्ठ क्रमांक १
थॉमस कुक तर्फे निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी ३ जुलैच्या ऐवजी ६ जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जामानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्स ची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबई मधल्या इमराईट्स च्याच आलीशान हाॅटेल मध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोचलाे आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो.
पंधरा दिवसांमध्ये दहा देश आम्ही पादाक्रांत करणार होतो. त्यामुळे प्रत्येक देशाला फक्त टपली मारूनच पुढे जाव लागेल असं वाटत होतं. थाॅमस कुक ने आमच्या साठी ठरविलेली मर्सिडीज गाडी मात्र फारच मस्त होती. आलीशान, स्चच्छ, आरामदायी, एअरकंडीशन्ड अशी ती बस लंडन मधल्या स्वच्छ सुंदर, गुळगुळीत रस्त्यांवरून जशी वहात चालली होती. मोठमोठ्या स्वच्छ काचांमधून लंडन शहर आणखीनच सुंदर दिसत होतं. एक्स्पर्ट इंग्लिश स्पीकिंग गाईड आम्हाला बस मधे बसल्या बसल्याच 'Highlights of London's landmarks' दाखवत होता. एक तर लंडनला एक दिवस उशीरा पोहोचल्या मुळे विमानातून लॅंड होऊन आम्ही डायरेक्ट या बस मध्येच बसलो होतो. त्यामुळे बस मध्ये आम्ही शाळेतल्या वांड मुलांसारखे बॅक बेंचर्स होतो. गाईडचे अॅक्सेंट नाही म्हटल तरी डोक्यावरून जात होते. बर्किंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, दि बिग बेन, वेस्टमिन्स्टर अॅबे, हाऊस आॅफ पार्लमेंट, ट्रॅफल्गर स्क्वेअर, पिकॅडली सर्कस, टाॅवर ब्रीज, थेम्स रिव्हर अस बरच काही काही गाईड दाखवत होता आणि त्या अनुषंगाने माहिती पण सांगत होता. नीट ऐकू येत नव्हत. कळत नव्हत. मला जरा नर्व्हस वाटायला लागल होतं. सगळं डोक्यावरून चाललंय असच वाटत होतं. असच रोज चालणार की काय. मग ट्रीपला काही अर्थच राहाणार नाही असही वाटायला लागल होतं. पण नंतर, मस्त इंडियन लंचचा आस्वाद घेऊन झाल्यावर मात्र आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला, मॅडम तुसाज् वॅक्स म्युझियम, सुप्रसिध्द लाॅर्डस् क्रिकेट ग्राऊंड, आणि लंडन आय यांच गाडीतून उतरून सविस्तर आणि एक्स्पर्ट गाईडच्या एक्सपर्ट काॅमेंटस् सह दर्शन घडविल आणि त्या दर्शनाने मात्र आमचे डोळे निवले आणि आत्मा थंड झाला. मग मात्र ट्रीपची खरी मजा यायला सुरवात झाली. खूप छान वाटायला लागल.
लंडन नंतर पॅरीस. आयफेल टाॅवरच्या सर्वात टाॅप (थर्ड) लेव्हलवरून पॅरीसच रमणीय दर्शन, सीन नदी मधून क्रुझ ने केलेला प्रवास, ब्रुसेल्स, अॅमस्टरडॅम, हाॅलंड आॅफ मिनीएचर, वगैरे करत करत, घनदाट वनराईमुळे वर्षानुवर्ष जिथे सूर्यप्रकाश जमीनीवर पोहोचू शकत नाही अशा सदाहरित ब्लॅक फाॅरेस्ट मधून प्रवास करत, डोंगर उतारावरच्या चित्रातल्या सारख्या देखण्या घरांची गाव बघत बघत, जगप्रसिद्ध कुकु क्लाॅक ची शोरूम पाहून आणि त्याची खरेदी करून, आणि जगप्रसिद्ध ~हाईन फाॅल्स च्या अगदी जवळ नेणाऱ्या छोट्या होडीतली धाडसी सफर करून, ट्रीपच्या आठव्या दिवशी आम्ही आमच्या एसी कोचने स्विट्झरलॅंड कडे प्रस्थान ठेवले.
जगप्रसिद्ध ~हाईन फाॅल्स
१३ जुलै च्या रात्री जवळ जवळ आठ साडेआठ तासाचा प्रवास करून, अर्थात मध्ये मध्ये साईट सीईंग करत आम्ही स्विट्झरलॅंड मधील झुरिच इथल्या Hilton हाॅटेल वर पोहोचलो. स्विट्झरलॅंड हा मध्य युरोपातील उंच उंच आल्प्स पर्वत रांगांचा प्रदेश, संख्येने विपुल असलेल्या निळ्या हिरव्या आरस्पानी विशाल तळ्यांचा प्रदेश, परीकथेतल्या सारख्या देखण्या कौलारू घरांच्या गावांचा प्रदेश. इथल्या जुन्या शहरांनी, राजधानी बर्न इथल्या झिट्ग्लाॅग क्लाॅक टाॅवर, कॅथेड्रील सारख्या मध्ययुगीन काळातल्या त्यांच्या मोठमोठ्या प्रेक्षणीय स्थळांच सौंदर्यही फार चांगल्या प्रकारे जपलं आहे. इथल्या स्की रिसाॅर्टस् आणि हायकिंग ट्रेलस् साठी सगळ्या जगातून पर्यटक इथे गोळा होतात. बॅंकिंग आणि फायनान्स इथल्या 'की इंडस्ट्रीज' आहेत आणि इथली चाॅकलेट्स आणि घड्याळ तर जगप्रसिद्ध आहेत. कल्पना शक्ती थिटी पडते इतका अफाट, भव्य आणि देखणा निसर्ग आहे इथे. अतिभव्य आणि डोळ्यांच पारण फिटाव असा लॅन्डस्केप. गगनाला भिडणा-या आल्प्स पर्वतांच्या ऊंच ऊंच रांगा, त्यांची शुभ्र धवल हिमाने आच्छादलेली शिखरं, नितांत सुंदर हिरव्या रंगात लपेटलेला अवघा परिसर, हिरव्या रंगाच्या अनेकविध छटांची मुक्त उधळण. सरळ सोट बुंधा आणि शेंड्याला एकमेकांत गुंतत विस्तारलेल्या फांद्या असे पाईन वृक्ष आणि आकाशा कडे निमुळते होत गेलेली सुरूची झाडे आणि तत्सम वृक्षांचं घनदाट जंगल, त्यांच्या सरळसोट शिस्तशीर बुंध्यांच मोहवणार जाळं सर्व दूर पसरलेल.
No comments:
Post a Comment