पृष्ठ क्रमांक २.
दूरवर डोंगरांच्या पायथ्यापर्यन्त पसरलेली विस्तीर्ण हिरवीगार कुरणे, डोंगरावरून मधूनच झुळझुळत खळखळत वहाणारे लहान मोठे झरे, क्वचित कुठे सरळसोट ऊंच कड्यावरून सुसाटत थेट खडकांवर धबा धबा कोसळणारे आणि उरात धडकी भरविणारे धबधबे, ऐल आणि पैल तीरावर हिरवाई घेऊन वाहणा-या हाईन, ल्युसन या नद्या, त्यांच पारसमण्या सारख मोरपंखी निळसर, स्वच्छ नितळ पारदर्शी पाणी, भरभरून प्रसन्न असलेल्या या देखण्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाची शोभा शतगुणित करणारी परीकथेतल्या सारखी अतीव सुंदर, टुमदार, कौलारू घरे. काही डोंगर उतारावर तर काही सपाटीला डोंगराच्या अगदी पायथ्याला, अगदी एकसारखी. भोवतालच्या निसर्गाशी अगदी एकरूप झालेली. कुठेही वैगुण्य नाही. विसंगती नाही. कुठेही कुरूपता नाही. सभोवतालच सारच देखणं, स्वच्छ, सुंदर. घरांच्या आसपास, उमललेल्या टवटवीत अनेकरंगी फुलांची सजावट. भोवताली एकरा दोन एकरा मध्ये वा-यावर डोलणारी पिकं. हिरव्या कुरणांमधून मुक्तपणे चरणात-या शेळ्या मेंढ्या आणि जास्त करून गायी आणि त्यांच्या गळ्यातल्या घंटांच पार्श्वसंगीत. सगळंच कस पहाटेच्या सुंदर स्वप्नासारख.
आठ साडेआठ तासाचा प्रवास करूनही कुणालाही दमणूक झाल्यासारखे जरा सुध्दा वाटत नव्हते. आमची आलीशान गाडी, अतिशय स्वच्छ सुंदर निरोगी हवा, दोन्ही बाजूला हिरवळीने आच्छादलेल्या अती उंच पर्वत रांगा आणि घनदाट जंगल यातून धावणारा झुळझुळीत रस्ता. त्यामुळे सर्वांचाच उत्साह ओसंडून वहात होता.
सकाळी सहाला वेक अप काॅल, सातला, 'एवढ्या सकाळी काय भूक लागणार' असं म्हणत म्हणत केलेला भरपेट नाष्टा आणि आठला गाडीत बसायचं असा रोजचा ठरलेला दिनक्रम असायचा. संपूर्ण युरोप ट्रीप मध्ये 'टाॅप आॅफ युरोप' आणि 'माऊंट टिटलीस' हे संस्मरणीय अनुभव. 'High points of the entire tour'. असं म्हणणं अगदी संयुक्तिक ठरावं. कांन्टिनेंटल ब्रेकफास्ट आटोपून आम्ही त्यातल्या 'टाॅप आॅफ युरोप' च्या रोमहर्षक अनुभवासाठी जुंगफ्राॅऊ इथे जाण्यासाठी लॅटरब्रुनेन या सुंदर शहराकडे जायला निघालो.अवती भवती डोंगर उतारावर छोटी छोटी लाल कौलांची, उतरत्या छपरांची घरे, सर्व दूर अनेकविध छटांमधून पसरलेली हिरवी जादू, उंचच उंच पाईन आणि फर वृक्षांची घनदाट गुंफण आणि डोंगरातून झेपावणा-या अनेक लहान मोठ्या धबधब्यांच पांढरशुभ्र फेसाळणार पाणी. मध्येच सर सर शिरवा शिंपणारा हिमवर्षाव, आकाशातून कापूस पिंजल्यासारखे धरणीवर उतरणारे पांढरेशुभ्र ढग असं निसर्गाच अवर्णनीय रूप किती पहाव आणि किती नाही असं होऊन जात होतं. जुंगफ्राॅऊ येथे जगतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. हा सर्व प्रवास करण्यासाठी, भोवतालच निसर्ग सौंदर्य शतगुणित करणा-या अतिशय देखण्या मिटरगेज मिनी ट्रेन्स आहेत. प्रवास एकूण दीड तासाचा. पण मध्ये एका ठिकाणी गाडी बदलावी लागते. लॅटरब्रुनेन ते लीन शेडगे या स्टेशनपर्यंत एका ट्रेनने आणि शेडगे ते जुंगफ्राॅऊ दुस-या ट्रेनने अशा दोन टप्प्यातून हा प्रवास करावा लागतो. तशी तर ही ट्रेन जवळ जवळ संपूर्णत: Eiger आणि Mönch या पर्वत रांगांमधून बांधलेल्या 'जुंगफ्राॅऊ' टनेल मधून जाते. परन्तु काही ठिकाणी ओपन स्पेसेस ठेवलेल्या आहेत जिथून तुम्ही रेल्वे ट्रॅक शेजारून जात असलेल्या बर्फाने आच्छादलेल्या पर्वत रांगा पाहू शकता आणि त्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता. या गाडीतून प्रवास करताना पहिल्या टप्प्यात सभोवताली आल्प्स पर्वतरांगावरची हिरवीगार कुरण, त्यांवर चरणा-या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यात वाजणा-या त्या टिपीकल काऊबेल्स आणि जवळून जाणा-या दुस-या मिनी ट्रेन्स असा सुंदर नजारा पाहायला मिळतो. सोव्हिनीयर्स म्हणून या काऊबेल्स सीटीमधल्या अनेक दुकानांमध्ये विकायला ठेवलेल्या आढळतात. या सिनिक रेल्वे ट्रॅकचे काम १६ वर्ष चालू होते आणि १/८/१९१२ रोजी युरोपातील ३४५४ मीटर उंचीवरील, जगातील सर्वात जास्त उंचीवरील हा रेल्वे मार्ग सर्वसामान्य लोकांकरिता खुला झाला. आल्प्स पर्वतातील जुंगफ्राॅऊ हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४१५८ मीटर (१३६४२ फूट) एवढी आहे. आम्ही जाणार होतो त्या जुंगफ्राॅऊ - टाॅप आॅफ युरोप या जागेची उंची ३४५४ मीटर (११३३३ फूट) एवढी आहे. ट्रेनने जसं जसं वर जायला लागलो तस तस पांढऱ्या शुभ्र बर्फात अवगुंठित झालेल्या आणि हिरव्या अलंकारांनी नटलेल्या सृष्टीच्या स्वर्गीय सौंदर्याच गारूड मनावर चढायला लागल होतं. जुंगफ्राॅऊ इथल्या हाॅटेल मध्ये आम्हाला इंडीयन लंच वुईथ शॅम्पेन असं अॅरेंज केलं होतं. जेवण सुंदरच होतं पण टूर मॅनेजरने आधीच सांगितल्या प्रमाणे इतक्या उंचीवर आल्यामुळे बऱ्याच जणांना विरळ हवेचा त्रास जाणवायला लागला होता. काही जणांना श्वास घ्यायला त्रास होत होता तर काही जणांना चक्करही आल्यासारखे वाटत होते. काही लोकांसाठी तिथल्या स्थानिक डाॅक्टरांनाही पाचारण कराव लागल. त्यामुळे काही जणांसाठी त्या ठिकाणाहून पुन्हा परत खालच्या पाॅईंट पर्यंत जाण्याची सोयही करण्यात आली. अर्थातच टूर मॅनेजरने ह्या सगळ्याची कल्पना आधी दिलेली होतीच. या पाॅईंट पासून पुढे अजून उंचावर इथली मुख्य आकर्षणं होती. मोठ्या अक्षरात लिहिलेल्या '<TOUR' या अक्षरांची खूण पकडून चालत राहिल की स्फिंक्स, अॅलेक्स ग्लेशियर, मॅजिक हट, अल्पाईन सेन्सेशन, आईस पॅलेस असं सर्व बघत बघत आपण आपोआप मूळ ठिकाणी येऊन पोचतो. स्फिंक्स याच्या टेरेसची उंची ३५७१ मीटर आहे. ४ जुलै १९३१ रोजी इथे एका संशोधन केंद्रांचे उदघाटन झाले. स्फिंक्स पर्यंत जाण्यासाठीची लिफ्ट २७ सेकंदात इथे येऊन पोहोचते. येतील उघड्या गॅलरीतून Glacier चा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. १९३४ मध्ये दोन डोंगरी वाटाड्यांनी येथील बर्फामधून गुहा खोदण्याचे काम सुरू केले. या गुहेत अनेक वाटा आहेत. आणि स्फटिका प्रमाणे चमकणारी, गरूड, पेंग्विन अशी बर्फातील अनेक शिल्प तिथे जागोजागी उभी केलेली आहेत. असा हा इथला आईस पॅलेस एक मानवनिर्मित चमत्कारच म्हणावा लागेल.
No comments:
Post a Comment